
लक्ष्मीनगर पोलीस चौकीचे पोलीस ठाणे झाले पुढे काय !
व्यसनाधीनता , बेरोजगारी कमी होऊन शिक्षणाचे प्रमाण वाढेल का ?
पुणे : शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी चौक्यांचे पोलीस ठाणे होत आहेत. मात्र त्यामुळे गुन्हेगारी कमी होणार आहे का हा प्रश्न आहे . येथील व्यसनाधीनता , बेरोजगारी कमी झाली , शिक्षणाचे प्रमाण वाढले तरच गुन्हेगारी कमी होणार आहे. या ठिकाणी पोलीस स्टेशन होणे भूषण नव्हे तर येथील सर्वांचे अपयश आहे.
लक्ष्मीनगर मध्ये साधी मराठी शाळा नाही. गेनबा सोपानराव मोझे शाळा होती ती पाडली ,आठवीत ते दहावी ची मोझे शाळेचे टिंगरेनगरला स्थालांतर केले. ज्याठिकाणी शाळा नाही तेथील मुले गुन्हेगार होणार नाही तर काय होणार. लक्ष्मीनगर मध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठे आहे. याठिकाणी गांजा सहज मिळतो. हातभट्टी दारूचे साम्राज्य आहे. बेरोजगारीमुळे अल्पवयीन मुले हातात कोयते घेऊन दहशत पसरवितात. अनेक स्वयंसेवी संस्था काम करतात मात्र त्यांचे प्रयत्न कमी पडतात. हीच स्थिती शहरातील अनेक वस्त्यांमध्ये आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. शरीराच्या एका भागाच्या आजारावरील उपचार सोडून दुसरीकडे इलाज केला जात आहे. त्यामुळे मुळातच शिक्षण, रोजगार , व्यसनमुक्ती यावर राज्य सरकार व महापालिकेने विचार केले तर पोलीस स्टेशनची निर्मिती करावी लागणार नाही. मात्र येथील लोकप्रतिनिधी , समाजसेवक आणि प्रशासन यांना दृष्टी ( व्हिजन ) नसल्यामुळे गेली कित्येक दशके लक्ष्मीनगर सारख्या वस्तीचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे या ठिकाणी पोलीस चौकी किंवा पोलीस स्टेशन होणे भूषण नव्हे तर येथील सर्वांचे अपयश आहे. मात्र हे येथील आजी व माजी नगरसेवक , समाजसेवक म्हणवणारे कार्यकर्ते , तेथील स्वयंसेवी संस्था , महापालिका प्रशासन ना पोलीस याना समजण्याच्या पलीकडचे आहे. कारण पोलीस स्टेशनच्या उद्धघाटनात हीच मंडळी पुढे मिरवणार आहेत. आपण येतील भाग्यविधाते कसे आहोत, आपल्यामुळे पोलीस चौकी कशी झाली हे सांगणार आहेत.
येथील समाजसेवक , आजी -माजी नगरसेवकांनी कधी लहानमुलांचे संस्कार वर्ग घेतले नाही, मुलांना कधी व्यवसायाचे स्किल दिले ना कधी व्यसनमुक्तीचे धडे दिले आहेत. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तर चक्क तेथील व्यसनाधीनतेला खतपाणी घातले. त्यांच्यामुळे गांजाचे साम्राज वाढले. याची दखल ना येथील नगरसेवकांनी घेतली ना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घेतली. त्यामुळे येथील गुन्हेगारी फोफावली आणि पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. यामुळे गुन्हेगारी कमी होईल कायदा व शांतता निर्माण होईल पण आधीचे प्रश्न सुटणार आहेत का ? येथील गुन्हेगार दुसरीकडे जातील तेथे साम्राज निर्माण करतील त्यामुळे पोलीस स्टेशन , चौक्या निर्माण करून उपयोग नाही तर मुळात येथील समस्यांचा विचार सामाजिक , आर्थिक व राजकीय स्तरावर सोडविले पाहिजे तरच येथील समस्या सुटणार आहेत. यासाठी नव्याने सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन आपले प्रश्न सोडवले पाहिजे असे येथील जाणकारांचे मत आहे.