
समीर उत्तमराव निकम पर्यावरण संवर्धन व इतिहास जतनासाठी समर्पित लढवय्या
समीर उत्तमराव निकम, रहिवासी संगमवाडी, हे गेली वीस-पंचवीस वर्षे पर्यावरण संवर्धन आणि इतिहास संशोधन या
दोन्ही क्षेत्रांत सक्रियपणे कार्यरत आहेत. वृक्षसंवर्धनाबाबत शासनाला सातत्याने धारेवर धरून जागृती निर्माण करणारे
आणि संगमवाडी परिसरातील १०० झाडांची तोड थांबवून ती कामे कायमची बंद पाडण्यात यशस्वी ठरलेले ते एक
प्रभावी पर्यावरण कार्यकर्ते आहेत. येरवडा भागातील सलीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीचे सदस्य म्हणून
त्यांनी अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवले आहेत.
इतिहास संशोधनातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. संगम पुलाजवळील नदीपात्रात बुडालेला ऐतिहासिक मारुतीचा
पुतळा शोधून काढणे, ब्रिटिश रेसिडेन्सी परिसरातील नष्ट होणारी थडगी वाचवण्यासाठी न्यायालयात लढा देणे,
चाफेकर बंधूंच्या स्मृतीसाठी बंडगार्डन घाटाला त्यांचे नाव देण्याचा आग्रह धरणे, तसेच अमळनेर तालुक्यातील
ऐतिहासिक दगडी दरवाजा वाचवण्यासाठी पुरातत्व विभागाशी आणि स्थानिक प्रशासनाशी संघर्ष करणे, अशा अनेक
ऐतिहासिक वारसा जतनाच्या मोहिमांत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
विशेष म्हणजे, होळकर पुलाशेजारील होळकर छत्रीवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी त्यांनी पंधरा वर्षांचा दीर्घ संघर्ष
केला, उपोषण आणि आंदोलने केली, आणि अखेरीस ही वास्तू राज्य शासनाच्या संरक्षित स्मारक म्हणून घोषित
होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. लवकरच त्यांचे "संगमवाडीचा इतिहास" हे पुस्तक प्रकाशित होणार असून,
महाराष्ट्रातील सरदार निकम घराण्याच्या दीडशेहून अधिक मोडी कागदांवर आधारित निकम कुलवृत्तांत हे पुस्तकही ते
प्रकाशनासाठी सिद्ध करत आहेत.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे समीर निकम यांना सन्मानित करण्यात आले आहे.