
“अलबेला आलम”चे चित्रीकरण पूर्ण; लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज
पुणे: हिंदी चित्रपट “अलबेला आलम” चे संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लेखक व दिग्दर्शक शाहानवाज शेख यांच्या बहुप्रतीक्षितचित्रपटाच्या अंतिम टप्प्यातील डबिंग, पार्श्वसंगीत (बॅकग्राऊंड स्कोर) तसेच सर्व तांत्रिक कामे पुण्यातील नामांकित डॉन स्टुडिओ येथे पूर्ण करण्यात आली. उत्कृष्ट ध्वनीसंयोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार चित्रपट निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या स्टुडिओमध्ये “अलबेला आलम”ला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यामुळे चित्रपटाच्या दर्जात अधिक भर पडली असून प्रेक्षकांना एक वेगळा आणि समृद्ध सिनेमॅटिक अनुभव मिळणार आहे.
नुकतेच चित्रपटाचे विशेष थिएटर प्रीव्ह्यू प्रदर्शन चित्रपटसृष्टीतील मान्यवर, निर्माते, चित्रपट तज्ज्ञ आणि निवडक पाहुण्यांसाठी डॉन स्टुडिओच्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आले होते. मोठ्या पडद्यावर चित्रपट प्रदर्शित होताच उपस्थित मान्यवरांनी चित्रपटाची कथा, सादरीकरण, संगीत, तांत्रिक बाजू आणि कलाकारांच्या अभिनयाचे मनापासून कौतुक केले. या सकारात्मक प्रतिसादामुळे संपूर्ण टीमचा उत्साह आणि आत्मविश्वास आणखी वाढला आहे.
या विशेष कार्यक्रमास सुभेदार फिल्म प्रॉडक्शनचे प्रमुख नितीन गुंड, एम अँड एम क्रिएटिव्ह फिल्म प्रॉडक्शनचे प्रमुख नितीन चंदन, निर्माता शाहरुख बागवान, ड्रीम क्राफ्ट फिल्म्सची संपूर्ण टीम, “मुळशी पॅटर्न”चे निर्माता भोसले सर, “मी शिवाजी पार्क” चित्रपटाचे निर्माता भरत राठोड, महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक अशोक गावते, दैनिक महा मेट्रोचे संपादक ॲड. दिलीप कुऱ्हाडे, दि स्टुडिओचे प्रमुख संजीव सिंघल, बॉलिवूड अभिनेते हसमुख सिंग जुनी, सिनेमॅटोग्राफर दिनेश कंदरकर, सारथी पिक्सेल मार्केटिंगचे संचालक निशांत कुमार शर्मा, डॉन स्टुडिओचे साउंड मिक्सिंग आर्टिस्ट मयंक त्यागी, टाइम लाईन स्टुडिओच्या सहायक संपादन भाग्यश्री तसेच ड्रीम क्राफ्ट फिल्म्सचे सहकारी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक शाहानवाज शेख यांनी सर्व निर्माते, कलाकार, तांत्रिक टीम, सहकारी आणि हितचिंतकांचे आभार व्यक्त करताना सांगितले,
“‘अलबेला आलम’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर अनेकांच्या विश्वास, मेहनत आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या समर्पणामुळेच हे स्वप्न साकार झाले आहे. हा चित्रपट आमच्या संघर्ष, जिद्द आणि स्वप्नांचा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.”
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात असून “अलबेला आलम” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस मोठ्या पडद्यावर येणार आहे.
मनातून जन्मलेली एक कथा…
संघर्षातून घडलेला एक प्रवास…
आणि वास्तवात उतरलेले एक स्वप्न…
“अलबेला आलम” — लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!