
*कायद्याची माहिती हीच खरी सुरक्षा : ॲड. अभिजीत कसबेकर*
*राष्ट्रीय विधी सेवा दिवस लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात उत्साहात साजरा*
पुणे ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे व निर्भय विद्यार्थी अभियान, पुणे शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीनगर पोलीस ठाणे येथे “राष्ट्रीय विधी सेवा दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत , येरवडा सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर, लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, ॲड. अभिजित कसबेकर, पोलीस निरीक्षक अमर कदम, ॲड. दिलीप कु-हाडे , निखिल गायकवाड , दिपक शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*कायदेविषयक मार्गदर्शन*
सदर कार्यक्रमामध्ये ॲड. अभिजित कसबेकर यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. सर्वसामान्य नागरिकांना कायद्याची माहिती नसल्यामुळे त्यांची अनेकदा फसवणूक होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून गरीब, गरजू, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मोफत कायदेशीर सल्ला व वकील उपलब्ध करून दिला जातो, याची माहिती त्यांनी दिली.
*विविध योजनांची माहिती*
यावेळी लोकअदालत, मध्यस्थी, तडजोड, मोफत विधी सल्ला केंद्र, हेल्पलाईन, तसेच महिलांसाठी आणि बालकांसाठी असलेल्या विशेष कायदेशीर योजनांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. एखाद्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात अडचण आल्यास घाबरून न जाता विधी सेवा प्राधिकरणाची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
पोलीस आणि विधी सेवा प्राधिकरण यांनी एकत्र येऊन नागरिकांमध्ये कायद्याबद्दल जनजागृती करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.